Monsoon Update : महाराष्ट्राच्या कुठल्या भागात 100 टक्के पाऊस कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज काय?
Monsoon Update : मान्सूनच्या पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात 100 टक्के पाऊस कोसळणार? कुठे 95 ते 98 टक्के कोसळणार? हवामान विभागाने काय म्हटलय ते जाणून घ्या. केरळमध्ये पोहोचलेला मान्सून मुंबईत कधी दाखल होणार?
नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून भारतात दाखल झालाय. केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी एक दिवस आधीच 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. लोकसभा निवडणूक निकालाबरोबर सगळ्या देशाच लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलं आहे. कारण देशातील अनेक भागात यावेळी उष्णतेने कहर केला आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीने अंगाची लाहीलाही होत आहे. होरपळून काढणाऱ्या उन्हातून चार पावल चालण सुद्धा कठीण बनलय. उष्माघातामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात रोज मृत्यू होत आहेत. तापमानाचा पारा काही भागात 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे मान्सूनचा पाऊस आपल्या भागात कधी पोहोचणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहे. एक दिलासा देणारी बाब म्हणजे केरळमध्ये मान्सून वेळेवर पोहोचलाय. त्यामुळे उर्वरित देशातही तो वेळेवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
केरळमध्ये आल्यानंतर दक्षिणेकडची राज्य व्यापून गोवामार्गे कोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. केरळमध्ये आल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो. यावेळी मान्सून 10 किंवा 11 जूनला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या दरम्यान हवामान विभागाने मान्सूनच्या पावसाबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत. कोकण, नाशिक, चंद्रपूरमध्ये 100 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचवेळी राज्यातील उर्वरित भागात 95 ते 98 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुण्यात सुद्धा 100 टक्के पावसाचा प्रमाण असेल. हवामान विभागाचे हे आकडे आहेत.
पावसात खंड कुठल्या महिन्यात पडणार?
जून-जुलै महिन्यात पावसात खंड पडेल. पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मागच्यावर्षी पावसाचा प्रमाण कमी होतं. त्यामुळे राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळी स्थिती आहे. धरण, तलाव आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतोय. यावर्षी, मुबलक पाऊस व्हावा, यामुळे पीक-पाणी चांगलं येईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी नागरिकांना अपेक्षा आहे. मान्सूनची चातकासारखी वाट पाहिली जात आहे. मान्सूनच्या पावसामुळे उकाड्यापासून सुटका होणार आहे. सध्या भीषण गर्मीने मुंबईकर प्रचंड हैराण झाले आहेत.