सेंद्रीय शेतीचा फायदा केवळ आरोग्यासाठीच नाही तर आर्थिकदृष्ट्या होतो, सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे एक तरुण शेतकरी….पाहा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट…
भारतात कृषी क्षेत्राचा विकास झाल्यानंतर कमी काळात कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर सुरू झाला. यातून देशात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. पण रासायनिक खते आणि औषधे यांच्या अतीवापराचे तीव्र दुष्परिणाम हळूहळू समोर येऊ लागले. त्यामुळेच शेती विषमुक्त केली पाहिजे तरच त्यातून विषमुक्त शेतमाल बाजारात जाईल आणि आपल्या कुटुंबाचे अर्थार्जन देखील होईल, असा विचार करत सांगली जिल्ह्यातील खानापूर या गावातील साईनाथ बाळासाहेब जाधव या तरुण शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे.
आपल्या शेतात कोणतेही रासायनिक खत किंवा रसायनांचा वापर ते करत नाहीत. केवळ जनावरांचे विशेषतः गाईचे शेण गोमुत्र यांचा वापर ते करतात. जगातील कोणतेही मशीन काही तासात शेतातील गवत पाल्याचे विघटन करून खत निर्माण करू शकत नाहीत, मात्र जनावरांमध्ये ही क्षमता असते, असा दावाही ते करतात. तीन एकरात रोटेशन पद्धतीने ते शेती करत आहेत.
औरंगाबादमध्ये विषमुक्त गहू उत्पादन अभियान
यातून त्यांना भरघोस आर्थिक उत्पन्न तर मिळत आहेच पण ते त्यांच्या पूर्णतः विषमुक्त असलेल्या शेतमालाचा दर स्वतः ठरवत आहेत. मेथीच्या २५० ग्रॅमच्या पेंडीला दहा रुपये दर त्यांना मिळतोय. या मालाचे मार्केटिंग ते स्वतः करत आहेत. त्यांच्या या विषमुक्त शेतात सध्या हळद, मेथी, पालक, कोथिंबीर, करडई कांदे कोबी यासह इतर पालेभाज्या आहेत. बदलत्या काळात आधुनिक पद्धतीचा अवलंब शेतीमध्ये केला जात आहे. पण त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी पावले शेती क्षेत्रात उचलली गेली तर त्याचा पुढील पिढ्यांना फायदा होईल.