Vermicompost Production : गांडूळखत निर्मितीच्या विविध पद्धती
Organic Farming : सेंद्रिय शेतीत गांडूळखताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळखत निर्मिती करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा काढलेले खड्डे योग्य पदार्थांच्या थरांनी भरून घेणे इत्यादी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
Vermicompost Production
Indian Agriculture : सेंद्रिय शेतीत गांडूळखताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनासाठी गांडुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळखत निर्मिती करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा काढलेले खड्डे योग्य पदार्थांच्या थरांनी भरून घेणे इत्यादी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जेणेकरून उत्तम दर्जाच्या गांडूळखत तयार होईल.
शेतीमध्ये पिकांचे दर्जेदान उत्पादन मिळविण्यासह उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्याचा जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खते उपयुक्त मानली जातात. आणि सेंद्रिय खतांपैकी एक उपयुक्त खत म्हणून ‘गांडूळखत’ ओळखले जाते. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनामध्ये गांडूळ अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.
गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीचा पृष्ठभाग सुपीक बनतो. गांडूळ काही झाडांची पाने आवडीने खातात. कुजलेले पदार्थ जमिनीत मिसळण्याची गांडूळ महत्त्वाची भूमिका करतात. त्यासाठी शेतीमध्ये गांडूळखताचा वापर फायदेशीर ठरतो.
गांडुळांच्या ३०० पेक्षाही जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी आयसेनिक फेटिडा, युड्रीलीज युजेनी या जातीचे गांडूळ हे खत निर्मितीसाठी वापरले जातात. गांडूळखत निर्मितीची प्रक्रिया साधारणपणे ४० ते ४५ दिवसांमध्ये पूर्ण होते.
गांडूळ खत प्रकल्पासाठी सावलीतील जागेची निवड करावी. निवडलेली जागा दमट हवेशीर ठिकाणी असावी. गांडूळ खत निर्मितीसाठी वापरावयाचे पीक अवशेष, शेणखत, झाडांचा पाला यांचे प्रमाण ३:१ इतके असावे. हे सर्व सेंद्रिय घटक गांडूळ सोडण्यापूर्वी १५ ते २० दिवस कुजवून घ्यावेत आणि नंतर त्यांचा वापर करावा.
गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग आणि खड्डा पद्धतीचा अवलंब केला जातो. या दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावली करण्याची आवश्यकता असते. जेणेकरून गांडुळांचे सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण आवश्यक होईल. शेडची लांबी २ ढिगांसाठी साधारण ४.२५ मीटर तर ४ ढिगांसाठी ७.५ मीटर इतकी असावी.
शेडवरील निवारा हा दोन्ही बाजूंनी उताराचा असावा. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५ मीटर, तर मधल्या खांबांची उंची २.२५ ते अडीच मीटर इतकी ठेवावी. शेडच्या छपरासाठी गवत, नारळाच्या झावळ्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिक कागद, लोखंडी पत्रे इत्यादीचा वापर करावा.
साधारणतः २.५ ते ३ मीटर लांब आणि ०.९ मीटर रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या झावळ्या, काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सेंमी जाडीचा थर रचावा.
या थरावर पुरसे पाणी शिंपडून तो ओला करावा. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेण, कंपोस्ट किंवा चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढ झालेली गांडूळ हळुवारपणे सोडावीत.
दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, गवत, गिरिपुष्प, शेवरी यांसारख्या हिरवळीच्या झाडांची पाने, खत, कोंबड्यांची विष्ठा इ. सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची साधारण ६० सेंमीपेक्षा जास्त असू नये.
कुजणाऱ्या पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर पोत्याचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. त्यामुळे ओलावा वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.
या पद्धतीमध्ये सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात गांडूळ खत निर्मिती केली जाते. त्यासाठी लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ०.६ मी. अशा आकारमानाचा खड्डा तयार करावा. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस टाकावे. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपोस्ट खत किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
दोन्ही थर पाणी शिंपडून ओले करावेत. त्यावर १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी ७ हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा साधारण ६० सेंमी जाडीचा थर रचावा. त्यावर पोत्याचे आच्छादन देऊन ते कायम ओले राहील याकडे लक्ष द्यावे.
रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा.
गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावा. असे करताना गांडुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
अशाप्रकारे गांडूळ खताचा झालेला शंकू आकाराचा ढीग करावा. खत तयार झाल्यावर पाण्याचा वापर बंद करावा. त्यामुळे गांडुळे तळाशी जाऊन बसतात आणि खत वेगळे करणे सोपे होते.
ढिगाच्या वरील भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिले व अंडकोष यांना पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे.
वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे. गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील. त्यामुळे गांडूळे आणि खत वेगळे करणे सोपे होईल.
प्रथम ढिगाच्या वरील गांडूळ खत काढून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ तासांत सर्व गांडुळे पुन्हा खत तयार करण्यासाठी बिछान्यात किंवा खड्ड्यात सोडावीत. अशा पद्धतीने खड्डा किंवा ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. तयार गांडूळ खत हेक्टरी पाच टन प्रमाणे दरवर्ष शेतामध्ये वापरावे.
शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरप्यांचा वापर करू नये. कारण या अवजारांच्या वापरामुळे गांडुळांना इजा होण्याची शक्यता असते.
जमिनीचा पोत सुधारतो. जमीन सुपीक बनते.
मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल होतो.
गांडुळांच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीची धूप कमी होते.
जमिनीतील मातीच्या थर वरखाली होतात. त्यामुळे माती उत्तम प्रतीची बनते.
जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यास मदत होते.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीचे रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
मातीचा कस टिकून राहतो.
जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.