जळगावकरांना मुसळधारची प्रतीक्षा ; जिल्ह्यात या तारखेला जोरदार पावसाची शक्यता..
राज्यात आज कुठे कोसळणार पाऊस?
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काल देखील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशी, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तर उत्तर महाराष्ट्राला अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
जळगावकरांना मुसळधारची प्रतीक्षा
जळगावात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नसल्यामुळे धुवाधार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आज २० ते २३ जून दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. २४ व २५ जूनला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून ढगांची वर्दळ वाढली आहे. जळगाव शहरात बुधवारी दुपारपर्यंत उन्हाचा तडाका सुरू होता तर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला होता. ५ वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते; परंतु उकाडा अजूनही कायम आहे.