जगात फक्त जैवविविधताच करू शकते विषमुक्त शेती, काय आहे सेंद्रिय शेती, काय आहे जैवाविविधता ???

जगात फक्त जैवविविधताच करू शकते विषमुक्त शेती, काय आहे सेंद्रिय शेती, काय आहे जैवाविविधता ???

 

आपल्याला वाटत असेल की विषमुक्त शेती अर्थात सेंद्रिय शेती करायची असेल, तर मग आपण जैवविविधता समजावून घेणे आवश्यक आहे. नाहीतर विषमुक्त शेतीची घोषणाबाजी होऊ शकते, प्रत्यक्षात मात्र काहीच नसेल, आणि काळानुसार हे फसवे आणि धोकादायक धोरण असेल, लोकांच्या आरोग्याकरिता याची नोंद सर्वांनी वेळीच घेतली पाहिजे. नाहीतर आपल्या चुकीच्या अनेक गोष्टी आपल्याला कधीच कळत नाहीत, अर्थात आजची विषमुक्त शेती तरी खूपच निराशाजनक आहे, हे विधान अत्यंत महत्वाचे आहे.

खरतर आपण शेती करत नाही, आपण फक्त पेरणी करतो आणि शेतीला पाणी देत असतो. बस हे एकमेव सत्य आहे. आता आपण विचार करूयात की, नक्की शेती कोण करतेय, कोण आहेत पडद्यावरचे कलाकार आणि कोण आहेत पडद्यामागचे कलाकर. मानव हा पडद्यावरील कलाकार आहे, जो छाती बडवून सांगतोय, मीच सर्व करतोय, बाकी काहीच संबध नाही, माझ्या आधुनिक शेतीमध्ये. खरतर इथेच गडबड सुरु होतेय चुकीच्या विचारांची. नुसती गडबड नव्हे तर हा मानवी अहंकार सुद्धा आहे. आपण विचार करूयात की, पडद्यामागचे कलाकर की ज्याला आपण नाव देऊयात जैवविविधता. आता शेती आणि आपली जैवविविधता हे नात समजाऊन घेणे आवश्यक आहे, नाहीतर विनाश अटळ आहे. आपण फक्त १ टक्के शेती करतो, बाकी ९९ टक्के शेती जैवविविधता करत असते. हा अर्थ खूप मोठा आहे, कदाचित मी ही या लेखात कमी पडेल बहुतेक मांडणी करयाला, पण मी जबाबदारीने प्रयत्न करेन.

कालची शेती जंगलात उगम पावली असून, जंगलात शेतीचे क्षेत्र निर्माण करून आपण शेतीचा जन्म सुरु केलेला आहे. जग म्हणजे जंगल, असच मानव लागेल आपल्याला, तरच पटेल, नाहीतर मी पणा आ वासून उभा राहील. भारत हा जंगल प्रधान देश होता, आता अजिबात नाही. कारण अनेक आहेत, यात शहरीकरण, औदोगीकरण, लोकसंख्या वाढ, अनियोजित जीवनशैली, आणि शेतीचे जंगलावर वाढते अतिक्रमण. या मुख्य बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. जंगलात शेती करणारे अनेक आदिवासी, जमीनदार १०० टक्के सेंद्रिय शेती करत होते, किंबहुना आजही आदिवासी लोक करत आहेत. मात्र जमीनदार बदलत गेले आणि आपल्या विकासाच्या गर्तेत सर्व जगच अडकत गेले. मग हरित शेती आणि हरितक्रांती झाली, मात्र खरी गोची इथच झाली, आणि आजची शेती आधुनिक मानल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीमुळे रसातळाला गेली, हे कबुल करावे लागेल, अलीकडे जगाने ते केले सुद्धा आहे. माझा विषय शेती नसून, आजची शेती सेंद्रिय करणेसाठी धडपडणारे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी मी लिहित आहे. आपण आता आपली आधुनिक शेती आणि जैवविविधता या विषयावर येऊन १०० सेंद्रिय शेतीकडे वळूयात.

खरतर जैवविविधता म्हणजे काय, सोप उत्तर आहे की मानव सोडून जे दिसेल ते सगळ. म्हणजे मुंगी ते हत्ती आणि अगदी जीवाणू विषाणू जे जग आपल्या डोळ्याला दिसत नाही. मात्र यात सुद्धा जीवाणू ते विषाणू ते मुंगी ते हत्ती यांच्यामध्ये असलेली गुंतागुंत. अगदी याच्यात असलेली गुंतागुंत म्हणजे यातून निर्माण होणारी उर्जा म्हणजेच जगाची वाढ. आता याचा अर्थ असा आहे की उर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरुपात प्रवास करीत असते. या उर्जेचा प्रवाह नैसर्गिकरीत्या वाहता ठेवणे म्हणजेच जैवविविधता जतन करणे. यात मानवाची लुडबुड म्हणजे उर्जेचे प्रवाह बदल करणे. आता यात आपण नैसर्गिकरीत्या अडथळे निर्माण करीत आहोत. अगदी रासायनिक खते, औषध, फवारण्या यांचा बेसुमार वापर हा शेतीतील उर्जा संतुलन बिघडवीत असतो. मग माती आजारी पडते, आणि मग पिक आणि मग माणस.

हे बिघडते उर्जा संतुलन पाहता, आता आपल्याला बदलाव लागेल. बदल म्हणजे काय तर आपल्याला शेती करण्यातील अनेक बदलांना सामोरे जावे लागेल, कारण ज्या शासनाने आपल्याला रासायनिक शेती शिकवली आता तेच शासन सेंद्रिय शेती करायला शिकवत आहे. खरतर हा मूर्खपणाचा कळस आहे, पण आता रचलाय तर पाडलाच पाहिजे. अर्थात आता सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरु करावी लागेल. मात्र हे आता तितके सोपे राहिले नाही, कारण जैवविविधता मोठ्या प्रमानात नष्ट झालेली आहे. आता या जैवविविधतेत काय शिल्लक आहे, ते पाहणे गरजचे आहे.

जमिनीतील नत्र, स्पुरद, पालाश सोडून आपल्याला काहीच माहिती नाही, किंबहुना बहुतेक जन तर म्हणतील याचापेक्षा शेतीला काहीच लागत नाही. अगदी याची गरज आहेच, मात्र ही मात्रा निर्सगात खूप आहे, ती बाहेरून दयाची गरज पडत नाही, ७८ टक्के नायट्रोजन आहे तरी पण युरिया का देतोय आपण. आता हा युरिया पाण्यात उतरून आपल्याला नासवायला लागलाय, कन्सरचे रोगी वाढत आहेत. तरी पण आपण घालतोय युरियाच. आता आपण समजून घेऊयात की, नैसर्गिक शेतीत, गांडुळे, मुंग्या, वाळवी, मधमाश्या, हुमणी, पक्षी, वटवाघळे, सस्तन प्राणी, साप, खेकडे, घोरपडी, ससे कश्या प्रकारे मदत करीत असतात.

आपण फक्त मुंग्या-वाळवी झाल्या की मारा बीसी, हुमणी झाली की मारा थायमिट, उंदीर झाले की टाका विषारी गोळ्या, कीटक आले की फवारा विषारी रसायने, पक्षी आले की घ्या गोफण, मधमाश्या नष्ट करायचा ठेकाच घेतल्यासारखे तोडतोय बोरी बाभळी, शेतात दिसला साप की टाक ठोका, विषारी गोळ्या टाकून काहीजण पक्षी मारतायेत तर काहीजण कीटकनाशक मारून मधमाश्या संपवतोय. आणि तरीपण उर काढून सांगतोय मी सेंद्रिय शेती करतो, माझा माल सरकारने प्रमाणित केलाय, सेंद्रिय. किती नालायकपण आहे हा सगळा.

सेंद्रिय शेती करायची असल्यास, शेतीच्या अवतीभोवती हे असलेच पाहिजे. काय असले पाहिजे यात बांधावर साधी बाभूळ, बोर, एकदांडी, टाकळा, गवत, रामफळ, आंबा, जांभूळ, मुंग्यांचे वारूळ, कधीतरी शेतीत सापाचे दर्शन झालेच पाहिजे, बोरी-बाभालीच्या झाडावर मधमाश्यांचे पोळे असलेच पाहिजे, मातीत गांडुळे दिसलीच पाहिजेत, उंदराची बिले सुद्धा, अधूनमधून घोरपड दिसलीच पाहिजे, कोल्होबाचे दर्शन झाले पाहिजे, खेकड्यांची बिळे दिसलीच पाहिजेत. हे सगळ असल ते होईल सेंद्रिय शेती, नाहीतर नावाला सेंद्रिय.

जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे व रासायनिक का नको….? ह्याबद्दलची 50 कारणे

भले शेतीचे कितीही तुकडे होऊ द्यात, मात्र शेतीचा बांध मजबूत असलाच पाहिजे. अगदी दात टोकरून कुठ पोट भरते का अशी म्हण उगीच नाही आली जनमानसात. प्रत्येकाने आपल्या शेतीचा बांध म्हणजे ताल वाटली पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांनी ताल राखली त्याचीच शेती सेंद्रिय होऊ शकते, एवढे लक्षात घ्यावे. कारण जैवविविधता आणि ताल याचा संबध खूप मोठा आहे, शिवाय किफायतशीर आहे, हे विसरून चालणार नाही.

जुन्या शेतकऱ्यांनी ताली खूप मोठ्या ठेवल्या होत्या कारण त्याशिवाय आपण शेती सुद्धा करू शकत नाही, हे त्यांच्या मनात ठासून भरले होते. मात्र आजकाल ताल म्हणजे पडीक क्षेत्र आणि मग ताल मोडा आणि त्यात सुद्धा पेरणी सुरु करा. ही शेती आजारी पाडण्याची सुरुवात झाली आणि आज शेती आजारी अवस्थेत आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बांध किंवा ताल मजबूत आहे, त्याची शेती सुद्धा दणकट आहे. त्याला खरी जान आहे शेतीची. उगीच बांधात पेरणी करणाराची शेती नव्हे, तो तर आजारी धंदा झालेला आहे. असो आपण आता फक्त शेती वाचवायची असेल तर फक्त जैवविविधता कशी वाचवायची आणि मग शेती यावर बोलूयात.

शेतीच्या बांधावर ‘’पक्षीथांबे’’ निर्माण करायचे असतील तर मग आपल्याला शेतीचे बांध मोठे करावे लागतील आणि ज्याला अगदी १ एकरापेक्षा जास्त शेती असेल त्यांनी शेतीच्या कडेने ताली मोठ्या केल्या पाहिजेत. काय आहे शेतीच्या बांधात आणि तालीत, अहो इथच आहे जैवविविधता. आपल्या शेतीच्या कडेने जैवविविधता वाढविणे अत्यावश्यक आहे. काहीजण तर चुकीचा विचार करतात की, शेतीच्या बांधावर किंवा तालीत झाड लावली की, झाडांच्या सावलीमुळे पिक उगवत नाही, मात्र मी, डॉ महेश गायकवाड खात्रीने सांगतो की आपली स्थानिक झाडे बांधावर असली तरी त्यांच्या सावलीत पिक जोमाने वाढतात. यात फक्त स्थानिक झाड आपल्या सावलीत पिकांना वाढविण्यासाठी मदत करतात. मात्र परदेशी झाड लावली तर शेती पडून राहणार हे नक्कीच. कारण निलगिरी, उन्दिरमारी, सुरु, गुलमोहर, घाणेरी, रेनट्री अशी परदेशी झाड लावली तर आपल्या शेतातील जीवाणू सुद्धा मारले जातील शिवाय जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होऊन नापिकता निर्माण होईल. या झाडातून जमिनीत पडणारी पाने सुद्धा असिडस् निर्माण करून जीवाणू ते गवत ते पिक संपवितात. शिवाय नारळ हे झाड कधीही बांधावर लावू नये, कारण दिवसात अगदी ७००-१२०० लिटर पाणी लागते नारळाच्या झाडाला. मग पिक करपू लागतात, नारळाच्या कडेने. निलगिरी तर कधीही बांधावर लाऊ नये कारण जवळपास २००० लिटर पाणी दिवसाला लागते, अहो इरिगेशन कॅनलच्या कडेने निलगिरी झाडे लावली कारण कि, कॅनल चे पाणी पाझरून जवळपास २ किमी अंतरापर्यंत जमीन क्षारपड होऊ लागली, मग जगातील जास्त पाणी पिणारे झाड लावायचे ठरले, त्यात निलगिरी प्रथम क्रमाकावर असल्यामुळे लावली. आपलाल्या पाणी कमी पडत आहे आणि त्यात जर चुकीची झाड लावली तर घोळच.

कडुलिंब, बोर, साधी बाभूळ, करंज, लिबुनी, भोकर, उंबर, निर्गुडी, तरवड, हादगा, शेवगा, आंबा, जांभूळ, कडीपत्ता, पपई, मोहा, सिताफळ, गोधन, शिवरी, एरंड हीच झाड शेतीच्या बांधावर असणे अत्यंत महत्वाचे आहे. ही सर्व स्थानिक झाड असून यांना पाणी खूपच कमी लागते. अहो आंबा वर्षाला फक्त ३०० लिटर पाणी पितो. बोरी बाभळी तर वातावरणातील पाणी शोषून घेत असतात. आपला उंबर तर दिवसाला १२०० लिटर पाणी जमिनीत सोडतो, मग तरीपण परदेशी झाड का लावतोय आपण. जरा मनाला विचारा, लोकहो स्थानिक झाड किफायतशीर, आरोग्यदायी, जैवाविविधातापुरक, भूजलपातळी वाढविणारी असताना सुद्धा आपण बांधावरील ही संपदा तोडतोय, हे पाहवत नाही.

आजकाल बांधावरील कडुलिंबाची झाडे अनेकांनी तोडली कारण काय तर हुमणी किडे यावर बसतात आणि मग त्यामुळे शेतात हुमणी वाढतेय. मात्र असे कधीच होत नाही कारण हुमणी ही जमिनीत असतेच, शिवाय पूर्वीपासून आपल्या शेतात सापडते. इथ गडबड का झाली कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उस पिक घेतले जाते, आणि दिवसेदिवस पाण्याची कमतरता वाढत आहे. ज्या शेतीला पाणी कमी तिथ उसाचे कुजणे सुरु होते आणि मग हुमणी कुजलेले अन्न खाण्यात पटाईत आहे. तिला कमी पाणी मिळालेल्या उसाच्या पाचाटीचा वास आला की जमिनीवर यायला सुरुवात करते आणि मग शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कारण शेतीला पाणी कमी पडू लागले आहे, आणि पुढे भविष्यात अजूनही पाणी तुटवडा होणार आहे. मग अजूनही हुमणीचे हल्ले वाढणार आहेत, हे फक्त उस पिकाच्या बाबतीतच घडणार आहे किंवा घडतेय. याचा अर्थ असा की चोर सोडून सन्यासाला फासी, आपण देऊन बसलोत, बहुतेकजण. यात आपले साखर कारखाने आघाडीवर असतात, यांचे शेतकी अधिकारी तर फतवे सुद्धा काढतात की, शेतीच्या बांधावर एकही झाड ठेवू नाक, तोडून टाका म्हणून. अस केल्याने निसर्गाचे आणि शेतीचे अमर्यादित नुकसान होत आहे. इथे जर जास्त कडूलिंब झाडे असतील तर मग त्यावर कावळा हा पक्षी हुमणीचा एक नंबरचा शत्रू, मात्र त्याला बसायला असलेले कडुलिंब झाड तोडले तर कावळे कसे येतील शेताकडे. तसेच हुमणीचा त्रास कमी करणेसाठी एरंड मोठ्या प्रमाणात लावणे आवश्यक आहे. यामुळे हुमणीचे प्रमाण कमी होईल.

दुष्काळी भागातील जसे बारामतीचा जिरायती पट्टा, माण खटाव, बीड अश्या अनेक ठिकाणी पहिले असता, १ एकर शेतीच्या बांधावर जवळपास २० ते ३० लिंबाची झाडे आहेत. शेतकरी त्याची निगा राखतात, आणि अभिमानाने सांगतात की, लिंबाची झाड शेतीला लीम्बुनी खत किंवा लिंब तेल फुकट देत असतात. तर अतिशहाणे शिक्षित शेतकरी ते विकत घेतात, दुर्भाग्य आपल्या देशाचे आहे की, आपले सर्वात मोठे नुकसान शिकलेल्या शिक्षित पिढीने केले आहे. अगदी शेती, निसर्ग, पर्यावरण आणि जंगलांचे. लिंब खत/पेंड/तेल असे नानविध बाबी कडुलिंबाची झाडे शेतीला पुरवीत असतात. आम्ही कधीच ही झाड तोडणार नाही, उलट अजूनही झाडे लावणार असे अभिमानाने सांगतात. अहो आपल्याला पाडवा आला की कडुलिंब आठवतो, तो ही दुसऱ्याच्या जागेत जाऊन त्याची फांदी तोडून आणावी लागते, हे खूप निराशाजनक चित्र आहे. अगदी वर्षातून उन्हाळ्यात याच्या काड्यांचा रस काढून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शिवाय जनावरे ही याचा पाला मोठ्या प्रमाणात खातात. राजस्थान सरकार याबाबतीत खूप सजग असून त्यांनी रोडच्या दोन्ही बाजूला कडुलिंब आणि करंज अशी झाडे राज्यभर लावली आहेत. उंटाचे आवडते खाद्य कडुलिंब आणि खेजडीचा पाला. आपल्याकडे ही शेळी, गाय, म्हशी याचा पाला खात असतात. मात्र आजकाल याचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. अहो माझे गाव निंबळक याचे नाव सुद्धा याच झाडावरून पडले असल्याचे इतिहास सांगतो. काही गावात याची फांदी सुद्धा जाळत नाहीत. शेतीचा बांधावर लावण्यास अत्यंत योग्य झाड आहे. कारण यामुळे अनेक प्रजातीचे पक्षी यावर येतात, घरटी करतात. हेच पक्षी अनेक प्रकारचे कीटक खाऊन शेतीचे कीडनियंत्रण करीत असतात, जेणेकरून आपला रासायनिक फवारणी खर्च वाचविला जातो.

पक्षी थांबे मधील झाड आहे करंज, शेतीसाठी अत्यंत उपयोगी असे झाड आहे कारण, या झाडाच्या पानावर अनेक प्रकारचे कीटक आणि पेस्ट आपली जीवनक्रम पूर्ण करतात, त्यामुळे हे कीटक आणि पेस्ट शेतात प्रवेश सुद्धा करीत नाहीत. शिवाय यांना फुले आली की मग, मधमाश्या फुलांवर तुटून पडतात. यात आपल्या शेतीमधील पिकांचे परागीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे उत्पादन ३० टक्के पेक्षा जास्त वाढते. शिवाय याच्या शेंगा विकून काही प्रमाणात आर्थिक फायदाही मिळतो.

पक्षी थांबे मधील साधी बाभूळ आणि बोर ही झाड तर शेतीचा कणा आहेत. कारण बहुतेक पक्षीथांबे मजबूत करायचे असतील तर बोरी आणि बाभळीची काटेरी झाडे पक्षी गणाला सुरक्षित वाटतात. यामध्ये पक्षांना आराम करणे आवडते, तसेच संरक्षण मिळते, खाद्य मिळते, घरटी करता येतात, मधमाश्या पोळी करतात, सुगरणी आपला खोपा बनवितात. मात्र आधुनिक माणसाला हे सगळ नको आहे, कारण पक्षी आले की आपल्या शेतातील धान्य खातील, ही भावना वाईट विचारांची आहे, यामुळे आपले कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे. मधमाश्या पूरक हो दोन्ही झाड आपल्या शेतीत विना पाण्याची सेवा करीत असतात. आपल्या शेळ्या मेंढ्या यांना भरपूर खाद्य देणारी ही झाड शेतीच्या बांधावर लावण आवश्यक आहे. पक्षी थांब्यातील अत्यंत महत्वाची झाड आहेत. कारण अनेक कीटक सुद्धा याच झाडांवर आपली जीविका पूर्ण करतात, जे कीटक पिकांवर हल्ले करण्यासाठी येतात, असे कीटक बोर आणि बाभळी वर आपली जीविका पूर्ण करून शेती मित्र होतात. तसेच यावर येणाऱ्या मुंगा आपल्या शेतीत खत निर्मिती करणारे घटक आहेत. मित्र कीटक म्हणून मुंग्या याच झाडांवर राहत असतात. त्यामुळे जैवविविधतेचा वसा घेऊन आलेली बाभूळ आणि बोर वाचवा तरच शेती वाचेल.

पक्षी थांबे मधील तरवड, जगातील सर्वात जास्त कीड आणि पेस्ट नियंत्रण करणारे झाड, म्हणजे तरवड. अहो शेतीच्या कडेला सर्वत्र दिसणारे झुडूप वर्गातील हे झाड शेतीचा कणा म्हटले तरी कमीच पडेल. पण आपला वाढता मुर्खपणाचा कळस म्हणजे तरवड तोडून अनेक परदेशी झाड लावून शेतीवर संकटे ओढवून घेणारी पिढी. आता जागृतपणे तरवड वाचविणे आवश्यक आहे. अहो बार्शी सोलापूर मधून येणाऱ्या दुधाच्या घागरी पहिल्या असतील एकदातरी आपण सर्वांनी, अगदी रेल्वे किंवा बस मधून या घागरी प्रवास करताना, त्याच्या तोडला पाढरे फडके बांधले असायचे आणि त्यावर तरवडाची गोल चुंबळ करून घागरीला बांधलेली असायची. कारण त्यामुळे दुध नासत नव्हते. एवढी ताकद या तरवडामध्ये आहे, हे आपण विसरून गेलो. मात्र भविष्यात शेती करायची असल्यास शेतीकडेने किंवा पडीक जमिनीत असलेले तरवड वाचविणे आवश्यक आहे. घटस्थापना आली की, सर्वांना एकदम आठवण येते तरवडाची, फुलांचा आणि पानाचा हार घालून, मग उंबराच्या झाडाखालची माती आणून, वडाची पत्रावळी करून त्यावर ७ विविध प्रकारची धान्य पेरणी करायची, आणि मग १० दिवस वाट बघायची. यात आपल्याला महत्वाचे म्हणजे पिकांची वाढ कशी होतेय हे घरीच समजायचे, आणि मगच पेरणी करायची का, हे उत्तर मिळायचे. एक प्रकारचे ग्रीन हाउस मधील प्रयोग म्हटले तर वावग ठरणार नाही. माणसाच्या नाकात माळीन सारखा आजार म्हणजे नाकात फोड येणे, हा आजार झाला की आजी म्हणायची फक्त तरवडाची फुलांचा वास घेतला की बर होत…..१०० टक्के बरे होणार.

आंबा – जांभूळ – शेवगा – सिताफळ – लिंबुनी – आवळा – पपई –  मोहा अशी अनेक किफायतशीर झाड शेतात असण म्हणजे आपल्या मनाची श्रीमंती लगेच सर्वांना दिसून येते. ही झाड जैवविविधता पूरक आहेतच. अनेक पक्षी, वन्यजीव यांनाही निवारा, खाद्य देतील आणि मानवाला सुद्धा. मात्र ज्यांचे बांध टोकरलेले असतात तिथे शांतता आणि समाधान निश्चितच नसते, हे आपण पाहत आहोत. अशी झाड म्हणजे घरातील मंडळी नक्कीच बलवान असतात. कारण घरात पिकते ते मनसोक्तपणे खायला ही मिळते. त्यामुळे बलवान पिढी हीच, देशाची ताकद आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल कुटुंब बलवान तर देश बलवान हे समजून घेतले तरच आपण सेंद्रिय शेती करू शकतो नाहीतर फक्त समाजाची आणि आपली फसवणूक.

शिवाय आपल्या बांधावर कुसली गवत, भाल्या गवत, त्यात दगडीपाला अर्थात एकदांडी असणे आवश्यक आहे. मधमाश्या परागीभवन करतात तर मुंग्या खत निर्मिती करतात, गांडुळे जमीन कसदार बनवितात. अहो पक्षी कीड नियंत्रण करतात, मग आपण काय करतो, तर पेरतो आणि पाणी देत असतो, म्हणून जैवविविधता अत्यंत महत्वाची आहे, अगदी शेती आणि शेतकरी यांच्यामधील दुवा आहे. हा दुवा तुटला तर आपण शेती सुद्धा करू शकत नाही, अगदी जगूच शकत नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे.

आजकालच्या सेंद्रिय शेती आणि विक्री व्यवस्थेवर न बोललेले बरे. काहीजण तर शेतकऱ्याकडून माल घेतात आणि शहरात आणून सेंद्रिय म्हणून विकतात, अनेकदा मी पाहते असतो, अनेकदा रोखायचा प्रयत्न ही केलेत. आपण ही हे वेळीच रोखले तरच खऱ्या सेंद्रिय मालाला किंमत मिळेल. आपल्या बांधावर येऊन आपला शेतमाल विकला गेला पाहिजे असे काही तरी करणे म्हणजे सेंद्रिय शेती आवश्यक आहे, भले थोडीच शेती करा, पण सेंद्रिय करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *