Crop Insurance : चिकू उत्पादकांना सुरक्षा कवच

Crop Insurance : चिकू उत्पादकांना सुरक्षा कवच

Fruit Crop Insurance : चिकू फळबागायतदारांना तीन वर्षांनंतर विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेण्यास सुलभ होणार आहे.

Chiku

Crop Insurance Scheme : चिकू फळबागायतदारांना तीन वर्षांनंतर विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेण्यास सुलभ होणार आहे. केंद्र व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या वाट्याचा विमा हप्ता कमी केल्यामुळे डहाणू परिसरातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०२१ मध्ये पंतप्रधान हंगामी फळपीक विमा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना १ जुलै ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीतून कोणतेही नुकसान झाल्यास विमा सुरक्षा कवच देण्यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला कंत्राट देण्यात आले होते; परंतु बागायतदारांच्या वाट्याचा विमा हप्ता परस्पर १८ हजार रुपये वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २०२१ ते २०२३ या तीन वर्षांच्या दरम्यान विमा सुरक्षा कवच योजनेवर बहिष्कार घातला होता. महाराष्ट्र राज्याची उत्पादक संघाने या निर्णयाविरोधात वारंवार सरकारचे लक्ष वेधले होते, मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Weather forecast ;राज्याच्या या भागात पावसाची शक्यता कमी ; हवामान विभागाचा अंदाज…

शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन दहिसर आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत या विषयाला वाचा फोडली होती. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यंदा १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेंतर्गत आता फक्त साडेतीन हजार रुपये हप्ता भरून विमा सुरक्षा कवच घेता येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात चिकू बागायतीचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्येदेखील चिकू फळांचे बाजारभाव असंतुलित असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा खर्चाचा भार सोसावा लागत आहे, त्यामुळे या विमा योजनेचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.

काय आहे सरकारी योजना?

१ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात सतत आठ दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास हेक्टरी ७० हजार रुपये, तर सतत चार दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व २० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास ३१ हजार रुपये नुकसानभरपाई विमा कंपनीने शेतकऱ्याला द्यावयाची आहे. विमा सुरक्षा कवच काळ संपल्यानंतर ६० दिवसांच्या आत ही मदत द्यावयाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास या रकमेचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *