विषमुक्त शेती व दूध उत्पादन करू इच्छिता? मग पनवेल येथील मधुकर कांबळेंच्या “मधूबन फार्म” ला नक्की भेट द्या
विषमुक्त शेती व दूध उत्पादन करू इच्छिता? मग पनवेल येथील मधुकर कांबळेंच्या “मधूबन फार्म” ला नक्की भेट द्या
मनुष्यप्राणी या पृथ्वीतलावर जन्माला आल्या आल्या त्याच्या आहारात सर्वात आधी येणार पदार्थ म्हणजे दूध. सुरुवातीला काही महिने आईचे दूध आणि तद्नंतर साधारणपणे गाय अथवा म्हशीच्या दुधाचे तो आयुष्यभर प्राशन करत असतो. पण सध्या जे दूध बाजारात उपलब्ध आहे त्या दुधाच्या शुद्धतेबाबत शंका येण्यास वाव आहे. पण पनवेल तालुक्यातील एक ध्येयवेड्या ६५ पार केलेल्या ‘चिरतरुण’ शेतकऱ्याने लोकांना शुद्ध दूध आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला देण्याचा व निरोगी जीवनशैलीचे महत्व पटवून देण्याचा ध्यास घेतला आहे. त्या असामीचे नाव आहे मधुकर कांबळे. २०१२ साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय खात्यातून सहसचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर रिकामे न बसता त्यांनी स्वतःला कृषिसेवेसाठी वाहून घेतले. चला तर नेमकं त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ सध्या बाजारात मिळणाऱ्या दुधा बाबतचे त्यांचे मत व या चळवळीत ते देत असलेल्या योगदानाबद्दल.
शासनामध्ये काम करताना माझ्या असे निदर्शनास आले की ‘हरित क्रांती’ च्या नावाखाली उत्पादन वाढविण्यासाठी अमाप प्रमाणात रासायनिक खतांचा व कीड नाशकांचा वापर चालू आहे व त्याचे दृश्य परिणाम आपण आता उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणे यासारखे आजार फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आपल्या राज्यात काही ठिकाणी एकेका गावात शे दोनशे पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. मागील ५ वर्षात माझ्या कुटुंब सर्कल मधील ५ लोक कर्करोगाने गेली आहेत. कर्करोग हा असा आजार आहे की तो फक्त त्या माणसाला संपवत नाही तर तो संपूर्ण कुटुंबाला मानसिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या संपवतो एवढी त्याची उपचार पद्धती महाग आहे हे दुष्ट चक्र थांबविणे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. हा विचार मी मनात पक्का केला व नैसर्गिक शेतीचा ध्यास वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला आणि सुभाष पाळेकरांची नैसर्गिक शेतीविषयक ची पुस्तके वाचायला सुरुवात केली व त्यांची पुणे व पनवेल येथील दोन शिबिरे केली व कर्करोग मुक्तीसाठी चा खारीचा वाटा म्हणून मी धोदानी, ता. पनवेल, जि. रायगड येथे माथेरानच्या पायथ्याशी १० एकर शेती विकत घेऊन विषमुक्त शेती व दूध उत्पादन सुरू केले आहे.
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
सध्या विविध ब्रांडचे दूध आपल्याकडे मिळत आहे ते दूध म्हणजे कंपन्याचे स्वतःचे उत्पादन नाही. या कंपन्या शेतकऱ्यांचे दूध सरकारी भावाने म्हणजे गाईचे दूध रू. २७/- प्रती लिटर आणि म्हशीचे दूध रू. ३५/- प्रती लिटर दराने खरेदी करतात. मी स्वतः म्हैस दूध उत्पादक शेतकरी आहे मला प्रती लिटर रू. ५०/- एवढा उत्पादन खर्च येतो, मग शेतकरी रू. ३५/- लिटर दराने शुद्ध दूध विकणे शक्य आहे का? याचा विचार ग्राहकाने करावा. सध्या टेलिव्हिजन व व्हॉट्सअँप वर आपण बघतोच आहे की कृत्रिम दूध तयार केले जात अाहे. आपल्या राज्यामध्ये सध्या ऊस हे मुख्य पीक झाले आहे, उसाची वाढ चांगली होऊन टनेज वाढून उत्पन्न चांगले मिळावे म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करीत आहे. ऊसाची लागण करताना ऊसाचे बियाणे रासायनिक प्रक्रिया करून जमिनीत लावले जाते व त्यानंतर जवळपास प्रत्येक १५ दिवसांनी त्यावर कीटक नाशकांची फवारणी केली जाते. तसेच रासायनीक खतांचा माराही वारंवार केला जातो. कारण आता शेतीही यंत्राने केली जाते, शेतकऱ्याकडे जनावरेच राहिलेली नाहीत त्यामुळे शेणखत नाही परंतु तरीही दुधाची कमतरता कुठेही जाणवत नाही. शेतकऱ्यांकडे जी काही जनावरे आहेत ती सर्व उसाची पाचट व वाडे यावर तसेच ऊसातील वैरण काडी यावर पोसली जात आहेत. म्हणजेच ती जनावरे सुद्धा रसायना वर पोसली जात आहेत, पर्यायी ते रसायन दुधा मार्फत आपल्यालाही मिळत आहे.
आमच्या शेतीचा परिसर हा माथेरानच्या टेकड्यांनी व जंगलाने व्यापलेला आहे व तो परी-संवेदनशील क्षेत्र (Eco Sensitive Zone) आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होऊ दिले जात नाही. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध माती अशा शुद्ध पर्यावरणाने नटलेला हा परिसर आहे. त्यामुळे या परिसरातील दूध व अन्नधान्य उत्पादने ही अती शुद्ध स्वरूपात मिळतात. आता हे सर्व मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहू शकता कारण हा परिसर पनवेल पासून फक्त १८ किमी दूर आहे व रस्ताही एकदम झकास आहे.
पनवेल मधील खांदा कॉलनीतील जय श्रीराम जॉगिंग ग्रुपचे २५ सदस्य आमच्या फार्म मध्ये बऱ्याच वेळा येऊन राहून गेले आहेत व त्यांनी आमच्या नैसर्गिक भाज्यांचा व दुधाचा आस्वाद घेतला आहे. सध्या त्यांच्या मागणी नुसार आम्ही त्यांना प्रती लिटर रू. ७०/- या भावाने घरपोच दूध देत आहोत व आता लवकरच खांदा कॉलनी सेक्टर १० येथे नैसर्गिक कृषी उत्पादनाचा एक विक्री केंद्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. नैसर्गिक शुद्ध दूध व अन्न धान्य पुरविणे एवढेच ध्येय समोर ठेऊन आम्ही कार्यास सुरुवात केली आहे यास आपला सर्वांचा पाठिंबा असावा व मा. सुभाष पाळेकर यांनी सुरू केलेली नैसर्गिक शेतीची चळवळ आपण पुढे चालू ठेऊ या व पर्यायाने आपला समाज व देश निरोगी व सशक्त बनवू या.
जय भारत………! 🙏🏻
– श्री. मधुकर कांबळे 【नैसर्गिक (ऑरगॅनिक) शेतीतज्ञ】
Madhuban Agro Tourism
Dhodani Road,At. Pimpalwadi, Dhodani, Dhodani, Maharashtra 410206
मोबाईल – 8652508768