Maharashtra Rain Updates : कोकण, घाट परिसरात धोधो! मराठवाडा, विदर्भात शेतकरी करतायेत पावसाची प्रतीक्षा
Maharashtra Rain Weather : कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड करायला सुरूवात केली आहे. तर मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांना अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र : यंदाच्या मान्सूनचा पाऊस राज्यभर आणि देशभर पसरला असून शेतकऱ्यांचे खरिपाचे कामे सुरू आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आणि लागवडी पूर्ण केल्या आहेत. तर जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे पेरण्या केल्या नाहीत. हे शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, यंदा जूनच्या सुरूवातीलाच मान्सूनने महाराष्ट्रात आगमन केले. परंतु दोन आठवड्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अद्यापही राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झाला नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर कृषी विभागाकडून जाहीर केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील विविध विभागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचं समोर आलं आहे.
कोकण-घाटमाथ्यावर भातलागवडीला वेग
कोकणात आत्तापर्यंतच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यांत म्हणजे सह्याद्री घाट परिसरातही सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरू केल्या असून इतर शेतीकामांनाही वेग आला आहे.
मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा
मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागांत चांगला पाऊस पडला. हा पाऊस मराठवाडा, विदर्भातही पडल्यामुळे आणि हवामान विभागाने यंदाचा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा १०६ टक्के पडण्याचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कमी ओलीवर पेरण्या आवरल्या आहेत. तर पेरण्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, या खरिपात राज्यातील १ कोटी ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणे अपेक्षित असताना त्यातील सुमारे ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पण उर्वरित क्षेत्रावर पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?