“Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा

“Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा

Agriculture News : पारंपरिक शेतीत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करत पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

नाशिक : कळवण तालुक्यातील (Kalwan) जुनी बेज येथील उच्चशिक्षित तरुणाने सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करत पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. आतापर्यंत ५६ टन उत्पादन घेतल्यानंतर अजूनही ५६ टन उत्पादन निघण्याची शक्यता या शेतकऱ्याने व्यक्त केली.

प्रयोगशील शेतकरी अमोल पाटील यांनी शेतात प्रथम कांदा लागवड (onion Cultivation) करत आंतरपीक म्हणून पपई या फळबाग पिकाची लागवड केली असून, त्यांनी संपूर्ण जैविक व सेंद्रिय खतांचा (Organic Farm) वापर करत पपई पिकातून कमी खर्चात भरघोस उत्पादन घेतले आहे. जुनी बेज येथील प्रयोगशील शेतकरी अमोल पाटील यांनी प्रथम दीड एकरमध्ये पंधरा नंबर व्हरायटीची रोपे आणत पपईची (Papaya Farm) लागवड केली. यातून साधारणतः आत्तापर्यंत पाच लाखांचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. आणखी साडेपाच ते सहा लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यांनी पपईचे क्षेत्र आणखी वाढवले आहे.

दरम्यान पपई लागवडीसाठी त्यांनी बाराशे चाळीस रोपे आणली. लागवडीसाठी त्यांना वीस हजार रुपये खर्च आला, तर खत आणि इतर मशागतीसाठी तीस हजार रुपये, ठिबक सिंचनसाठी चाळीस हजार रुपये, आंतरमशागत पंचवीस हजार रुपये व मजुरीसाठी तीस ते पस्तीस हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपये एवढा खर्च झाला. आतापर्यंत यांना ५६ टन उत्पादन मिळाले आहे. अजूनही या पिकातून ५६ टन इतके उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. सरासरी ८ रुपयांपासून ते ३८ ते ४० मिळाला आहे. सध्या ८ ते १० रुपये किलो भाव मिळत असून, हा भावदेखील परवडतो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पपई घेण्यासाठी जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान येथून व्यापारी थेट बांधावर येत आहेत. त्यामुळे त्यांचा खर्चदेखील वाचत आहे.

विषमुक्त शेतीचा प्रयोग

पपईचे माहेरघर व आगर असलेले नंदुरबार, पुणे यासह अनेक भागात जाऊन शेतकरी पाटील यांनी भेट देत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांनतर पीक लागवडीपासून ते उत्पादन निघेपर्यंत प्रक्रिया समजावून घेतली. रासायनिक शेतीला बाजूला सारत विषमुक्त शेतीचा प्रयोग यशस्वी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय शेतीमुळे पपई फळाला चांगला बाजारभाव मिळाला. व्यापारी बांधावर येऊन मजुरांद्वारे फळ काढणी करून घेत आहेत. बांधावर पैसे मिळत असल्याने फळ काढणी व विक्रीसाठी शेतकऱ्यांचा होणारा अवास्तव खर्च वाचला आहे.

– अमोल पाटील, प्रयोगशील शेतकरी, जुनी बेज

 

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यात दमदार पाऊस; पहिल्याच पावसात मध्य रेल्वेचे तीन तेरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *