Success Story of Farming : …आणि माझी नैसर्गिक शेती झाली व्हायरल
तो दिवस होता २७ ऑक्टोबर २०१४. अवघ्या २० गुंठे जागेत कष्ट, चिकाटीने मी आणि माझी पत्नी सौ. कुंदाकडून सुरू असलेल्या नैसर्गिक शेतीच्या प्रयोगाची यशोगाथा ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या दिवसाची सकाळ आमच्या कायम आठवणीत राहील. आमच्या शेतीची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ती यशोगाथा वाचून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी फोन करून आमचं कौतुक केलं.
काही केल्या मोबाइल बंद होण्याचं नाव घेत नव्हता. वाचक भरभरून बोलत होते. सल्ला घेत होते, देत होते. आम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत होते. काही वाचकांनी आम्हाला त्यांच्या गावात, शेतात यायचं निमंत्रण दिलं. दोन-तीन दिवसांत ३००-४०० वाचकांनी फोन केले. मला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. त्या दिवसापासून प्रयोगशील शेतीसाठी लागणारी दुप्पट ऊर्जा माझ्यात आली. नैसर्गिक शेतीच्या या प्रयोगांना लोकांसमोर मांडण्याची प्रेरणा मला त्यामुळे मिळाली. माझी खटपट, धडपड वाढली आणि त्यातून पुढं काही वर्षांत हे आज दिसत असलेलं ‘सुदामा शून्य खर्च नैसर्गिक शेती पर्यटन केंद्र’ मी उभं केलं.
शेतकऱ्यासाठी रोजचा दिवस काबाडकष्टाचा असतो. त्याला त्याच्या घरच्या लोकांच्या वाढदिवसाच्या तारखाही लक्षात राहत नाही. मात्र मी २० एप्रिल २००५ ही तारीख कधीही विसरणार नाही. कारण त्या दिवशी ‘ॲग्रोवन’चा जन्म झाला. ही १८ वर्षांपूर्वीची गोष्ट. जुन्नरच्या बेल्हे गावात आम्ही रडतखडत शेती करीत होतो. कीडनाशकं, तणनाशकं, रासायनिक खतं वापरून मी थकलो होतो. ती शेती परवडत नव्हती. काय करावं ते सूचत नव्हतं.
मी कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रं आणि कृषी मेळाव्यांमधून फिरायचो. तिथं आपल्या समस्येचं काही उत्तर मिळेल, अशी आशा असायची. पण ती फोल ठरायची. शास्त्रज्ञ काय बोलतात ते मला समजत नव्हतं. अशा वेळी या दैनिकाचा जन्म झाला. मला अजून आठवतंय, की त्या दिवशी मी गावच्या श्रीराम मंदिराजवळ उत्सुकतेनं थांबलो होतो.
शेतकऱ्यांचं पहिलं वर्तमानपत्र कसं असेल याची उत्सुकता होती. आणि सोळा पानाचं हे दैनिक हातात आलं. या दैनिकाचा आकार छोटा. त्यामुळे ती साप्ताहिक पुरवणी की विशेषांक, हेच मला कळत नव्हतं. पण मी भुकेल्या वाचकासारखा पहिल्या रट्ट्यात सारा अंक वाचून काढला आणि मनाला एक दिलासा मिळाला. हा पेपर माझ्यासाठी सुरू झालाय आणि आता तोच मला मार्ग दाखवंल, अशी पहिल्याच दिवशी मनोमन खात्री पटली. पुढं झालंही तसंच.
मी रोज हे दैनिक वाचायला लागलो. त्यातून शेतीमधल्या समस्या कळू लागल्या. तांत्रिक माहिती मिळू लागली. काय करावं, काय करू नये हे समजू लागलं. नैसर्गिक शेतीकडं माझी पावलं झपाट्याने पडू लागली. कमी खर्चात, कमी जागेत, विषमुक्त शेती करायची हाच ध्यास मी घेतला होता. आधी मी काही प्रयोग केल होतेच. माझ्याकडं केवळ ३० गुंठे शेती होती. त्यापैकी २० गुंठ्यांत मी प्रयोग करीत होतो.
या प्रयोगांची चर्चा होत गेली. ही चर्चा पुण्याला या दैनिकाच्या कार्यालयात पोहोचली. तिथून वार्ताहर संतोष डुकरे माझ्या शेतीवर आले. त्यांनी माझी यशोगाथा लिहिली. त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक शेतकऱ्यांबरोबर मी जोडला गेलो. इतकं नाही, तर पूर्वा केमिकल्सचे मालक संजय पवार यांच्या वडिलांनीही ही स्टोरी वाचून मला प्रोत्साहन दिलं.
पुढे पवार परिवार मधमाशीपालन व्यवसायात आले. त्यांनी माझ्या शेतात माणसं पाठवली आणि मधमाश्यांची पेटी ठेवली. पुढे शेतात चार-पाच ठिकाणी मधमाश्यांची पोळी तयार झाली. त्यांनी तीन वर्षांपूर्वी बोलावून माझा सत्कारदेखील केला. तो माझ्या कष्टाचा सन्मान होता. पण या दैनिकाचा प्लॅटफॉर्म मिळाला नसता तर हे सगळं घडलं असतं, असं मला वाटत नाही.
crop insurance update | सर्व शेतकऱ्यांना मिळणार सर्व पीक विमा !