सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची पद्धती
पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.
पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी जिवामृत आणि बीजामृत यांचा वापर करावा. हे घरगुती पातळीवर स्वस्तामध्ये तयार करणे शक्य आहे. भारतीय शेतीला ४५०० वर्षांचा इतिहास असून, प्राचीन काळापासून जमिनीच्या मशागतीपासून ते शेतीमालाच्या विक्रीपर्यंतचे नियम तयार केलेले दिसून येतात. त्या काळी समाजाच्या ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची माहिती अथर्ववेदात आलेली आहे. प्रामुख्याने गोपालनाशी संबंधित अशा सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब त्या काळी केला जात असे. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनींची सुपीकता कमी होत आहे. किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, उत्पादन खर्चात वाढ होत आहे. शाश्वत उत्पादनासाठी शेतकऱ्यांना सेंद्रीय किंवा जैविक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक निविष्ठा स्वतःच्या शेतातच, गावातच तयार करता येतात. कमी खर्चातील जिवामृत, बीजामृत या द्रवरूप खते किंवा कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याविषयीची माहिती घेऊ. माती ही त्यातील सूक्ष्मजिवांच्या संख्या योग्य असल्यास जिवंत मानली जाते. हे जिवाणू जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कार्यरत असतात. त्यासाठी खालील मुद्द्यावर काम केले पाहिजे.
जमिनीतील जिवाणूंची व नैसर्गिक गांडुळांची संख्या वाढविणे.
जमीन सजिवांनी समृद्ध करणे.
जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविणे.
पिकांची व मुळांची वाढ चांगली होणे.
रासायनिक खतावरील खर्च वाचविणे.
जिवामृताचा पिकांवर होणारा इष्ट परिणाम तपासणे.
जमिनीतील अन्नद्रव्य पिकांस उपलब्ध करून देणे.
जिवामृत निर्मिती व वापर साहित्य
२०० लीटर क्षमतेचे प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंटची टाकी
१० किलो देशी गायीचे ताजे शेण
१० किलो देशी गायीचे गोमूत्र
२ किलो काळा गावरान गूळ
२ किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ (बेसन)
२ किलो वडाच्या झाडाखालची किंवा बांधावरील (शेतीतील) जिवाणू माती (गाळ)
१०० ग्रॅम रायझोबीयम, पीएसबी यासारखी जिवाणू संवर्धके प्रत्येकी ( उपलब्ध असल्यास)
कृती जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंट टाकीमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व १०० ग्रॅम उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी. डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते. एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी. किंवा हजार लीटर क्षमतेच्या टाक्या मध्ये वरील प्रमाण पाचपट करून मिश्रण तयार करावे. गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे. शेतकरी जिवामृत तयार करण्यासाठी विविध प्रमाणात साहित्य वापरतात. ते द्रावण ठेवण्याचे दिवसही वेगवेगळे आहेत. मात्र, वरील साहित्य किमान व योग्य प्रमाणात आहेत.
जिवामृत वापरत असताना जमिनीत ओलावा असल्यास विशेष फायदेशीर राहते.
जमिनीत ओलावा असताना कडुनिंबाच्या डहाळीने किंवा साध्या फवारणी यंत्राने पिकांच्या ओळीत जमिनीवर शिंपडावे.
बी टोकून पेरलेल्या पिकांना (उदा. कापूस, मिरची, केळी, पपई इ.) यांच्या बुडाशी भांड्याने झाडाच्या आकारमानाप्रमाणे २५० ते ५०० मि.ली. या प्रमाणात प्रति झाड टाकावे.
पिकांना ओलीत देताना मुख्य चारीत बारीक धार (पाईप किंवा भांड्याने) धरावी. हे पाणी पुढे सरीत जाऊन पिकांच्या मुळापाशी जाते.
काही शेतकरी सर्व घटकांचे प्रमाण वाढवून पातळ कणकेसारखे जिवामृत तयार करतात. असे जिवामृत गोणपाटात भरून पाण्याच्या पाइपच्या तोंडाखाली ठेवतात. त्याद्वारे पाण्यासोबत शेतात पसरते.
ठिबक सिंचन पद्धतीने देण्यासाठी जीवामृत गाळूनही द्यावे लागते. अन्यथा लॅटरल व इमिटर बंद होऊ शकतात.जिवामृत वस्त्रगाळ करून त्याची फवारणीही करता येते.
उत्कृष्ट जिवामृताचा रंग तांबडा ते काळसर असतो.जिवामृताचे नत्राचे प्रमाण ३ ते ६ टक्क्यांपर्यंत असते.जिवामृताचा सामू जवळपास आम्लधर्मी असतो.उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या निरनिराळ्या प्रजातींच्या वाढीसाठी जिवामृत हे उत्कृष्ट अन्नस्त्रोत ठरते.
जिवामृतातील सूक्ष्म जिवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. त्यातील कर्ब व नत्राचे गुणोत्तर कमी होते.जिवामृत द्रवरूपात असल्याने जिवाणूंची संख्या व टिकण्याचा कालावधी वाढतो.जिवामृत जास्तीत जास्त ३० दिवसांच्या आत वापरावे.
जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्यांचा साठा मुबलक असला तरी तो पिकांना उपलब्ध स्वरूपात असत नाही. जमिनीमध्ये जिवाणू असल्यास ते आपल्या जीवनचक्रातून पिकाला जमिनीतून किंवा वातावरणातून योग्य वेळी उपलब्ध करून देतात. परिणामी पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो. जिवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते.
त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
सेंद्रीय शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते. ते कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.जिवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.जिवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
बिजामृत तयार करणे बियाणे पेरणी किंवा रोपे लावण्यापूर्वी बीज व रोप संस्काराद्वारे त्यांची उगवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमुळे जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणाला सेंद्रीय पद्धतीने थांबविणे शक्य होते. साहित्य पाणी २० लीटर, देशी गाईचे ताजे शेण १ किलो, गोमूत्र १ किलो, दही १ लीटर, कळीचा चुना ५० ग्रॅम, संबंधित पिकाच्या मुळातील माती, हिंग १० ग्रॅम, एक पिंप, उपलब्ध जिवाणू संवर्धक (ट्रायकोडर्मा) कृती वरील सर्व साहित्याचे मिश्रण पिंपातील पाण्यात टाकून चांगले ढवळावे. हे बिजामृत रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी काडीने ढवळून बियाणांच्या बिजसंस्कारासाठी वापरावे. बिजामृताचा वापर
रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी
पिकांचे वा भाजीपाल्यांचे बियाणे जमिनीवर किंवा गोणपाटावर पसरावे. त्यावर बिजामृत शिंपडावे व हातांनी बी वरखाली करावे. बियांवर बिजामृताचे अस्तर चढेल. बी सावलीत सुकवून पेरावे.
भाजीपाल्यांची, फळझाडांची रोपे लावण्यापूर्वी त्याच्या मुळ्या बीजामृताच्या द्रावणात पाच मिनिटे बुडवून लागवड करावी. द्राक्ष किंवा डाळिंबाच्या हुंड्या बीजामृतात बुडवून लावाव्यात.