राज्यभरात आज जोरदार पावसाचा इशारा; खान्देशात कशी असेल स्थिती ?
जळगाव । अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह आणखी मजबूत स्थितीत आल्याने राज्यभरात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने आज मंगळवारी (ता. २५) देखील कोकणासह घाटमाथ्यावर तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ( Weather Update )
आजही जळगावसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अलर्ट ; हतनूरचे चार दरवाजे उघडले
जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे आणि मुंबईचा समावेश आहे, तर वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यात धुळे तसेच नंदुरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.
दरम्यान, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागात पावसाचे प्रमाण काहीअंशी कमी असण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.