Fruit Crop Farming : तेंडोळीच्या वानखडे यांनी धरली फळबागांची कास
Fruit Crop Management : तेंडोळी (ता. आर्णी) येथील दिलीप वानखडे- पाटील यांनी २०१८ पासून फळबाग शेतीची कास धरली. लिंबू, सीताफळ, पेरू, अंजीर आदींची विविधता जपत त्यांनी या शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
Fruit Crop Farming Success Story : यवतमाळ जिल्ह्यात आर्णीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर तेंडोळी गाव आहे. येथील दिलीप पाटील- वानखडे यांची वीस एकर शेती आहे. पैकी १४ एकरांवर त्यांनी फळबाग लागवड केली आहे. उर्वरित सहा एकरांत कपाशी, सोयाबीन यांसारखी हंगामी पिके ते घेतात.
काही वर्षांपूर्वी ते बहुतांशी क्षेत्रात पारंपरिक पिकेच घेत. मात्र हवामानाच्या समस्येबरोबर दरांत देखील सातत्याने चढउतार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आर्णीचे तत्कालीन कृषी अधिकारी रमेश पसलवार, कृषी सहायक अर्चना शेंद्रे यांच्या सोबतच्या संवादातून त्यांना फळबाग लागवडीचा सल्ला मिळाला. या भागात कोणती फळपिके घेणे शक्य आहेत याबाबतही कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
सन २०१८ च्या सुमारास वानखडे यांनी बाजारपेठांचा अभ्यास करून फळबाग पद्धती निश्चित केली. आज त्यांच्या बागेत लिंबाची ३०० झाडे आहेत. रोपांची खरेदी स्थानिक रोपवाटिकाधारकाकडूनच करण्यात आली. त्याच वर्षी पेरूच्या लखनौ ४९ या वाणाच्या १६०० रोपांची लागवड १५ बाय ६ फूट अंतरावर केली.
या भागात पेरूची लागवड करणारे वानखडे पहिलेच शेतकरी आहेत. लागवडीसाठी सघन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे या भागात त्यांनी केलेली लागवड कौतुकाचा तसेच चर्चेचा विषय ठरली होती. पंधरा जूननंतर बागेत फळधारणा होते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळे परिपक्व होऊन विक्रीसाठी तयार होतात.
लिंबू व पेरूच्या बरोबरीने सीताफळाची ६०० झाडे लावली असून, एनएमके या वाणाची निवड केली आहे. यात १५ बाय १० फूट असे अंतर ठेवण्यात आले आहे. फळे नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात. शास्त्रोक्त व्यवस्थापनातून प्रति झाड २५ ते ३० किलो फळे मिळतात. या भागात अंजीर हे तसे नवे पीक आहे. त्याची १० बाय १० फूट अंतरावर ७०० झाडे आहेत. हा प्रयोग देखील २०१८ मध्येच केला आहे.
नेर येथील खासगी रोपवाटिकाधारकाकडून १५० रुपये प्रति रोप याप्रमाणे त्याची खरेदी करण्यात आली. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे मिळण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते. साधारण पाचव्या वर्षापासून चांगली उत्पादकता मिळण्यास सुरुवात होते, असे वानखडे यांचा अनुभव आहे. सध्या २० ते २५ किलो प्रति झाड असे उत्पादन मिळत आहे.
१५ ते ३० मे या कालावधीत फळपिकांची छाटणी केली जाते. नाशिक येथील शंकर वाघेरे
यांच्याकडून तीन दिवसांचे तंत्रशुद्ध बाग छाटणी प्रशिक्षण वानखडे यांनी घेतले आहे. सिंचनासाठी विहीर आणि शेततळे असे दोन पर्याय आहेत. फळबागेत पाण्याचे संपूर्ण व्यवस्थापन ठिबकद्वारे होते.
यंदा पावसाच्या पाण्यामुळे शेततळे पूर्ण भरले आहे. गरज पडल्यास विहिरीतील पाणी शेततळ्यापर्यंत आणून त्याचाही संरक्षित म्हणून वापर केला जातो. बागेचे संपूर्ण व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याकरिता रिंग पद्धतीने दरवर्षी प्रति झाड १५ ते २० किलो प्रमाणे शेणखत वा गांडूळ खत दिले जाते. जिवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदी जैविक घटकांच्या वापरातही सातत्य राखले आहे.
फळांचे पॅकिंग करून ती अमरावती, यवतमाळ, नागपूर या भागातील व्यापाऱ्यांना पाठविली जातात. त्यांच्या माध्यमातून विक्री झाल्यानंतर पैसे ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित होतात. आर्णी शहरात वानखडे यांचा किराणा मालविक्रीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी हंगामात उत्पादित फळांचे दोन किलोचे बॉक्स करून ते विक्रीसाठी ठेवतात.
फळांचा दर्जा चांगला असल्याने हातोहात विक्री होते. सीताफळाच्या थेट विक्रीतून किलोला १०० रुपये तर घाऊकमध्ये केवळ ३० रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. अंजिराला किलोला ७०, ८० ते काही वेळा कमाल २०० रुपयांपर्यंत, तर पेरूला ३१ ते ५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
आंतरपिके आणि बांधही उत्पन्नक्षम
इंच-इंच जागेतून उत्पन्न मिळविण्याचा उद्देश जपत शेतीचे व्यवस्थापन करणाऱ्या वानखडे यांनीबांधावर चिंचेची लागवड केली आहे. सोबतच शेताच्या काही भागातील बांधावर निलगिरीची लागवड केली आहे. पेरूच्या नव्या बागेत सोयाबीनचे आंतरपीक घेत व्यवसायिकतेचा आदर्श जपला आहे.
दिलीप पाटील- वानखडे, ९६८९१८२५२५
जिल्ह्यात फळबागा क्षेत्र आश्वासक
यवतमाळ जिल्हयात फळपिकांखालील क्षेत्र वाढते आहे. आजमितीला संत्र्याखालील क्षेत्र सर्वाधिक असून, त्याखालोखाल लिंबू, मोसंबी, सीताफळ, आंबा व त्यानंतर डाळिंब, आवळा, फणस, पेरू, शेवगा अशी पिके येतात. यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे म्हणाले, की जिल्ह्यात एकूण खरीप लागवड क्षेत्र पावणेनऊ लाख हेक्टर आहे.
पैकी सरासरी पाच लाख हेक्टरवर घेतली जाते. मात्र नजीकच्या काळात परिवर्तनवादी मानसिकतेतून सिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फळबागांच्या लागवडीवर भर दिला आहे. यवतमाळच्या सीमा आंध्र प्रदेशशी जुळलेल्या आहेत. त्योबतच उपराजधानी नागपूरची देखील बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे फळांच्या बाजारपेठेला चालना मिळते आहे.”
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?